पुणे : जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आले आहे. वर्ष २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांत हजार मुलांमागे ८७३ मुलींचा जन्म झाला आहे. २०१५-१६ पुर्वीच्या पाच वर्षात हे प्रमाण ९२७ एवढे होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण लिंग गुणोत्तर ९२४ वरून ९१८ पर्यत खाली आले आहे. राज्याच्या तुलनेत पुणे जिल्हा जवळपास ५० ने पिछाडीवर पडला आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे. या अहवालामध्ये लिंग गुणोत्तरासह गर्भवती महिला व लहान मुलांचे आरोग्य, लसीकरण आदी मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. अहवालानुसार राज्यात २०१५-१६ मध्ये हजार पुरूषांमागे ९५२ महिला होत्या. २०१९-२० मध्ये हे प्रमाण वाढून ९६६ पर्यंत पोहचले. पण पाच वर्षांची तुलना केल्यास मागील पाच वर्षांतील लिंग गुणोत्तर ९२४ वरून ९१३ एवढे झाले आहे. राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याचे दिसते २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात हजार पुरूषांमागे ९२४ महिला होत्या. पुढील पाच वर्षांत त्यामध्ये ६ ने घट झाली आहे. मागील पाच वर्षातील आकडेवारीही धक्कादायक आहे. हजार मुलांच्या मागे २०१५-१६ मध्ये ९२७ मुली जन्माला आल्या होत्या. तर २०१९-२० मध्ये हे प्रमाण ८७३ पर्यंत खाली आले आहे.
------------
महिलांना आरोग्य सेवा
प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. हे प्रमाण ४३.१ टक्के आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ३७.९ एवढे होते. प्रसुतीनंतर ८४.२ टक्के महिलांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाल्याचे अहवालात नमुद आहे. तसेच प्रसुतीसाठी नावनोंदणीचे प्रमाणही ९२ टक्के आहे.
-------------
मुलांचे लसीकरण
जिल्ह्यात १२ ते १३ महिन्यांच्या मुला-मुलींच्या लसीकरणाचे प्रमाण २०१९-२० मध्ये तुलनेने कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये ९५.४ टक्के मुलांनी सर्व लशी घेतल्या होत्या. तर मागील पाच वर्षाती हे प्रमाण जवळपास ८० टक्के एवढे आहे. मागील पाच वर्षात जन्माला आलेल्या जवळपास ८२ टक्के मुलांना बीसीजी लस टोचली आहे.
--------------
पुणे जिल्ह्याची स्थिती
२०१५-१६ ला हजार मुलांमागे मुली - ९२४
२०१५-१६ ला हजार मुलांमागे मुली - ९१८
-----------------------------