पुणे : दिल्ली येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात पुणे महापालिका व पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील 92 जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी 35 जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, पुढील कार्यवाही चालू असल्याची माहिती महापालिकेतील अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
सहभागी नागरिकांची पोलिसांना यादी मिळाली होती. त्यातील काही जणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधून काढली आहे. तर इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत. परिणामी निझामुद्दीनच्या कार्यक्रमातून देशभर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. निझामुद्दीन येथून परतलेलले नागरिक पिंपरी-चिंचवडचे रहिवासी असून उर्वरित पुणे ग्रामीण भागातील आहेत.
देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) भीतीचं वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. त्यांनी निझामुद्दीनमधील तब्लिगी मारकझला भेट दिली.
एकट्या तेलंगणातून 1000 लोक सहभागी झाल्याचा अंदाज -
निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या बैठकीत सहभागी झालेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेलंगणा सरकार चिंतीत आहे. यामुळे तेलंगणा सरकार निजामुद्दीन येथील मरकजमध्ये भाग घेतलेल्या लोकांचा कसून शोध घेत आहे. एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत, 'या मरकजमध्ये तेलंगणातील 1000 लोक दिल्लीला गेल्याचा अंदाज असल्याचे म्हटले आहे. संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचाही शोध घेत आहे.
याशिवाय हिमाचल पर्देशातून 17, तर पदुच्चेरीतील 6 जणांनी या मरकजमध्ये भाग घेतला होता, अशी माहिती तेथील सरकारांनी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील तब्बल 19 जिल्ह्यांतील लोक या जमातमध्ये सहभागी झाले होते असे समजते.