पुणे : शहरातील तब्बल आठ लाख घरांमधून दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छ संस्थेचे काम काढून ते ठेकदाराच्या घशात घालण्याचा डाव पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने रचला आहे. ठेकेदारधार्जिण्या या धोरणाविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव वयाच्या ९२ व्या वर्षी आंदोलन करणार आहेत. सोमवारी शेकडो कचरावेचकांसमवेत डॉ. आढाव पालिका भवनासमोर आंदोलन करणार आहेत.
महापालिका प्रशासन मागील सहा महिन्यांपासून स्वच्छ संस्थेला दोन महिन्यांची मुदतवाढ देत आले आहे. संस्थेसोबत संपलेला करार पुन्हा करण्यात यावा अशी विनवणी मागील अनेक महिन्यांपासून कष्टकरी करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत या कामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून शहरामध्ये कचरा संकलन करण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या व्यवस्थेचे कंत्राटीकरण करण्यात येणार असल्यामुळे कचरा वेचकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोरोनाच्या काळात काम करून सुध्दा कचरा वेचकांना सुरक्षा साहित्य, आयुर्विमा, वैद्यकीय सहाय्य आणि प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. ठेकेदराच्या हितासाठी ही व्यवस्था बंद पाडण्यात येत आहे. त्यामुळे आता शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
शहर ‘कंटेनर मुक्त’ करणारया स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या जागतिक पातळीवर गौरविल्या गेलेल्या ‘मॉडेल’ला घरघर लागली आहे. कष्टकऱ्यांची ही चळवळ मोडीत काढून एका खासगी कंपनीला कचरा गोळा करण्याचे कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आल्याने कष्टकरी संतापले आहेत. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार ४०० कोटींचा हा मामला आहे. ठेकेदार कंपनीने त्याचे सविस्तर ‘प्रेझेंटेशन’ही प्रशासनाला दिले आहे.