लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा सोबतच जिल्ह्यात महिलांच्या कौटुंबीक हिंसाचारात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात देखील भाजीत मीठ जास्त झालं, नव-याकडून घर कामाची अपेक्षा, शरीरसंबंधास नकार दिला, माहेराहून पैसे आण, मिळालेल्या हुंड्याबाबत असमाधानी, आदी किरकोळ कारणावरून महिलांचा छळ सुरू आहे. जिल्ह्यात कोरोना काळात महिला सुरक्षा व दक्षता समितीकडे 932 केसेस दाखल झाल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून अधिक असल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सांगितले.
कोरोना आणि लाॅकडाऊनचे संकट यामुळे अनेकांचा रोजगार गेला. लाॅकडाऊनमुळे नोकरी, कामा निमित्त घराबाहेर पडणा-या महिलांना घरात थांबण्याची वेळ आली. घराची आर्थिक घडी विस्कटली. याचा परिणाम कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने या काळात 6023 कुटुंबाचे कौटुंबिक हिंसाचाराबाबत सर्वेक्षण केले. तर जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने स्थापन केलेल्या महिला सुरक्षा व दक्षता समितीकडे 932 केसेस दाखल झाल्या. यापैकी 907 केसेस समितीच्या स्तरावर निकाली काढण्यात आल्या. तर 27 प्रकरणामध्ये तोडगा निकाली न निघाल्याने 27 पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.
-------
- जिल्ह्यात कोरोना काळात सर्वेक्षण केलेले कुटुंब : 6032
- कोरोना काळात दाखल झालेल्या केसस : 932
- समितीने निकाली काढलेल्या कसेस : 905
- तोडगा न निघाल्याने पोलिसांकडे वर्ग केलेल्या केसेस - 27
-------
घर कामाची अपेक्षा, शरीरसंबंधास नकार आदी कारणांवरून छळ
लाॅकडाऊनमुळे पती, पत्नी दोघे घरी असल्याने त्यात एकत्र कुटुंब असलेल्या सासू-सासरे सर्वांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाष्टापाणी करताना कधी भाजीत मीठ कमी जास्त झाले, तरी नवरा, घरातल्या लोकांकडून रात्र दिला जातो, नव-याला एखादे काम सांगितले, शरीरसंबंधास नकार आदी किरकोळ कारणावरून महिलांचा छळ होत आहे.