सध्या ४५ ते ५९ वर्षांच्या लोकांचे २४ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. यामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन कॅम्पव्दारे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ६४ हजार ६५३ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये पहिला डोस ५७ हजार ७७६ लोकांचा झाला आहे. तर ६ हजार ८८० लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. यामध्ये आरोग्य विभागाशी निगडित असणाऱ्या दोन हजार ४३२ लोकांचे लसीकरण झाले आहे. फ्रंट लाईन वर्कर्समध्ये ३ हजार २९५, ६० वर्षांवरील २८ हजार ८१८ लोकांना, तर ४५ ते ५९ वयोगटातील २३ हजार २३१ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्यात एकूण २ लाख १२ हजार ८५६ लोकांचे लसीकरण करायचे आहे.
सध्या लसी संपत आल्या असल्याने बुधवारी फक्त ५ ठिकाणी लसीकरण सुरू होते. लस आल्याबरोबर लसीकरण पुन्हा जोमात सुरू होईल, यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी नेमण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात लसीकरणाबाबत आंबेगाव तालुक्याचे काम समाधानकारक आहे. दररोज २ हजार ९६४ लोकांचे लसीकरण केले जाते. आरोग्य विभागाच्या टीम लसीकरणाचे काम गावोगावी जाऊन करत आहेत, १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू होण्यापूर्वी वयस्कर लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण केले जाणार आहे, असे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.
१ तारखेपासून १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी लोकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. सर्वांचे लसीकरण होईल. लोकांनी जास्त गर्दी करू नये, असे अवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले.