रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटल्याने कोविड केअर सेंटर बंद केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी दिली. या कोरोना सेंटरमधून आत्तापर्यंत तब्बल ९४६ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
देशात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र पसरली होती. मांडवगण फराटा परिसरात तांदळी इनामगाव, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, बाभूळसर बुद्रुक, वडगाव रासाई, आंधळगाव, नागरगाव या गावांतील नागरिकांना वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला होता. नागरिकांना कोरोना टेस्ट करण्यासाठी शिक्रापूर शिरूर व दौंड या ठिकाणी जावे लागत होते. परिणामी वेळ व पैसा खर्च करूनही नागरिकांना धावपळ करावी लागत होती. नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार,आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेत तालुक्याच्या व अनेक गावांच्या मिळून मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने रावलक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून मांडवगण फराटा, उरळगाव, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी पिंपळे जगताप, चौफुला या ठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी केली.त्याला अनेक ग्रामस्थांनी,परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत धान्य, फळे, किराणा आदी मदत देऊ केली होती. त्यामुळे अनेक रुग्णांना चांगले जेवण, नाष्टा मिळत होता.
एप्रिल महिन्यामध्ये शिरूरच्या पूर्वभागात भागातील गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती.
मात्र, मेअखेरीस वैद्यकीय व लॉकडाऊन या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या कमी होत गेली व आता बाधितांची संख्या नगण्य झाल्याने कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या निरोप समारंभप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे, मांडवगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मंजूषा सातपुते, सरपंच शिवाजी कदम, संभाजी फराटे, धनंजय फराटे व परिसरातील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमावेळी सर्व स्टाफ अत्यंत भावूक झाला होता.
--
--
डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केली रात्रंदिवस सेवा
डॉक्टर अन् स्टाफने अहोरात्र केली रुग्णसेवा
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील असणाऱ्या मांडवगण फराटा कोविड केअर सेंटरमध्ये डॉ. यशपाल काळे यांनी तब्बल दोन महिने आजारी असतानाही कुठलीही रजा न घेता रुग्णसेवा करत तब्बल ९४६ रुग्णांवर उपचार केले. अनेक अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्यावर भर देत ते २४ तास फक्त कोविड केअर सेंटर मध्येच असत. त्यांच्या बरोबरीने वैद्यकीय अधिकारी मंजूषा सातपुते या सतत मार्गदर्शन करत असायच्या. सुरेखा सोळसकर, शकुंतला शेंडगे,प्रेमलता कास्तेकर, सुवर्णा खोकले, अमृता कस्टेकर, शोभा खुरांगे या परिचारिकांनी जिवाचे रान करत प्रत्येक रुग्णाची काळजी घेतली. त्यांच्या बरोबरीने दिलीप चौगुले,सागर पवार,दिलीप गव्हाणे यांनी सुरक्षेबरोबर रुग्णांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेत येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाला धीर देण्याचा प्रयत्न केला. रेखा मोरे,वैशाली गायकवाड,सचिन पवार,अभिषेक चौगुले,आकाश सूर्यवंशी,अजय भंडलकर,श्रीकांत खोमणे यांनी जेवण,नाष्टा पुरविण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत सर्व कामे केली.