डिंभे : जांभोरी (ता. आंबेगाव) येथील आरोग्य उपकेंद्रांतर्गत हरणमाळ, लोहारवाडी, लिंबोणीची वाडी, माचीचीवाडी, बांबळेवाडी नांदूरकीची वाडी व काळवाडी ही गावे येतात. या गावातील ९५ टक्के नागरिकांचा लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस पूर्ण झाला असल्याची माहिती आरोग्यसेविका वर्षा मसळे यांनी दिली.
लसीकरणासाठी आशा कार्यकर्त्या मनीषा केंगले, वर्षा केंगले, कमल पारधी, तसेच आरोग्यसेवक सुधाकर मिडगुले, प्राथमिक शिक्षक शांताराम रणदिल, संजय केंगले ,बाळू मडके, मारूती पारधी, लतीका काळे यांचे सहकार्य मिळाले. जांभोरी गावातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन लसीकरण करण्यात आल्यामुळे लसीकरणाचे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले. उर्वरित नागरिकांसाठी २४ व २५ ऑगस्ट रोजी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे, तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सेविका वर्षा मसळे यांनी केले आहे.
याकरिता आरोग्य सुपरवायझर धनंजय घोसाळकर, बबन राजगुरू, माणिक बाणखेले,डॉ. गिरीश उभे, डॉ. गुरुदेव म्हस्के व डॉ. चेतन पाटील यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई जढर, ग्रामसेविका चारुशीला बोडरे, संजय सरोदे, मारुती केंगले आदी उपस्थित होते. आदिवासी भागातील उच्चांकी लसीकरण झालेले जांभोरी हे पहिले गाव ठरले आहे.
--
सोबत- फोटो-१९ ऑगस्ट २०२१ डिंभे लीसकार
फोटो ओळी : डिंभे येथे लस घेताना ग्रामस्थ.