पुणे : राज्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असले तरी, ९५ टक्के रुग्ण (५,७९५) हे घरीच उपचार घेत आहेत. तर, हाॅस्पिटलमध्ये ४.८ टक्के (२९२) दाखल असून, त्यापैकी केवळ ०.७ टक्के (४६) रुग्ण आयसीयूमध्ये भरती आहेत. यावरून काेराेनाचे रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यामुळे गंभीर आजारी पडण्याची संख्या कमी असल्याने दिलासा मिळाला आहे.
एकेकाळी देशातच नव्हे तर जगभरात हाहाकार माजवणाऱ्या काेराेनाचा उपद्रव आता कमी झाला आहे. सध्या ओमिक्राॅनचा एक्सबीबी १.१६ हा व्हेरिएंट पसरत आहे. त्याची संसर्ग करण्याची क्षमता जास्त असल्याने संसर्ग वाढला असला तरी, गंभीर रुग्णांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यातच मंगळवारी काेराेनाचे १५ हजार ३१३ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ९४९ नवे रुग्ण आढळून आले सहा जणांचा मृत्यूची नाेंद झाली.
बहुतांश रुग्ण चार जिल्ह्यातच...
सध्या राज्यात काेराेनाचे ६ हजार ११८ रुग्ण सक्रिय आहे. त्यापैकी, सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे जास्त प्रमाणात आहेत. उर्वरित जिल्ह्यांत ही संख्या १०० किंवा त्यापेक्षा कमी आहे.
एक जानेवारीपासून ६८ जणांचा मृत्यू
यावर्षी एक जानेवारीपासून १८ एप्रिलपर्यंत ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ७३ टक्के रुग्ण साठ वर्षांपुढील आहेत. या ६८ रुग्णांपैकी ५७ टक्के रुग्णांना सहव्याधी हाेत्या, तर ३४ टक्के रुग्णांना काही आजार हाेते का, याची माहिती आराेग्य खात्याकडे उपलब्ध नाही.
जिल्हानिहाय रुग्णसंख्या
मुंबई - १६७७
ठाणे- १००३
नागपूर- ७८६
पुणे - ७६४
रायगड - २२०
पालघर - १८७
सांगली - १६०
साेलापूर - ११३
धाराशिव - १०५
‘एक्सबीबी’चे सर्वाधिक रुग्ण पुण्यात
राज्यात काेराेनाच्या एक्सबीबी १.१६ या व्हेरिएंटचे ६८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ६८१ पैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.
शहरात काेराेनाचे रुग्ण राेजच ४० ते ५० वाढतात. परंतु, त्यांचे ॲडमिशन रेट वाढत नाही. जे पाॅझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या घरच्यांना काॅलिंग करताे आणि त्यांना सर्दी, खाेकला ही लक्षणे असतील तर लगेच तपासणी करायला सांगताे.
- डाॅ. सूर्यकांत देवकर, साथराेग अधिकारी, पुणे मनपा