पुणे : यंदाच्या हंगामात देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अधिकृत अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. येत्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुधारीत अहवाल जाहीर करण्यात येणार असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असाही अंदाज असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. तसेच अंदाजापैकी ५ टक्के अधिक किंवा ५ टक्के कमी होण्याची शक्यताही आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिल्लीमध्ये मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. या वेळी हवामान विभागाचे सचिव डॉ. एम. महोपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डी. एम. रविचंद्रन उपस्थित होते. त्यांनी अहवाल जाहीर केला. देशात जून ते सप्टेंबर दरम्यान ८७० मिमी पावसाचा अंदाज आहे. साधारणपणे सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल. ९६ ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला तर त्याला सामान्य समजला जातो. दरवर्षी हवामान विभागाच्या पहिल्या पावसाच्या अंदाजाची वाट शेतकरी पाहत असतात. त्यावर त्यांचे भविष्यातील पिकांचे नियोजन ठरवायचे असते. आज भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज हा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे. पुढचा अंदाज मे महिन्यात जाहीर होईल. तेव्हा मान्सूनचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकते. दरम्यान, स्कायमेट संस्थेने ९४ टक्के पावसाचा अंदाज यापूर्वी व्यक्त केला आहे.
हवामान विभागाकडून पावसाच्या अंदाज व्यक्त करण्याच्या पाच श्रेण्या असतात. त्यात ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालाा म्हणजे तो अपुरा असतो. तर दुसऱ्या श्रेणीतील पाऊस ९० ते ९५ टक्के सरासरीपेक्षा कमी असतो. तिसऱ्या श्रेणीमधील ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सामान्य सरसरीचा असतो. साधारणपणे १०५ ते ११० आणि ११० हून अधिक टक्के पाऊस झाल्यास तो सर्वाधिक समजण्यात येतो. यंदा तिसऱ्या श्रेणीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्व डाटा तपासून अंदाज
वातावरणातील स्थितीचा आधार घेऊन दीर्घकालीन अंदाज व्यक्त करण्यात येतो. सध्या अत्याधुनिक मॉडेल तयार असल्याने त्याद्वारे हा अंदाज सांगितला जातो. त्यामध्ये अवकाश, समुद्राची स्थिती काय आहे, वाऱ्याची दिशा आदी बाबी तपासून अंदाज सांगितला जातो. देशभरात हवामान केंद्रांमधील रडार यंत्रणा आणि उपग्रहाच्या माध्यमाचाही वापर केला जातो. हा सर्व डाटा तपासल्यानंतर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
एल-निनोचा प्रभाव ?
यंदाच्या मॉन्सूनमध्ये एल-निनोची स्थिती तयार होऊ शकते. एल-निनोचा परिणाम जुलै महिन्यानंतर दिसण्याची शक्यता आहे. पण एल-निनो आला म्हणजे पाऊस कमीच पडणार, असेही नसते. कारण १९५१ ते २०२२ या कालावधीमध्ये एल-निनो वर्षांमध्ये सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, असेही आयएमडीने नमूद केले.