पुणे : खडकवासला धरण साखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८0 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधील तब्बल १५.३८ टक्के (४.४८ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्याने तसेच जून अखेरीस पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडावे लागणार. जून महिन्यात पावसाला सुरूवात न झाल्यास पुणे शहरातील पाणीकपात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेकडूनही कपातीबाबत विचार सुरू करण्यात आला असून, जून महिन्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण़्यात आले.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणी पातळी मे अखेर अवघ्या ९.६२ टक्क्यांवर आली आहे. या प्रकल्पात चार पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे असून, या धरणांची एकूण क्षमता २९ टीएमसी आहे. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने आॅक्टोबर २0१५ अखेर या धरणांमध्ये केवळ ५0 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील गावांसाठी पाण्याचे नियोजन केल्यानंतर ३0 मे अखेर या पाणीसाठा २.८0 टीएमसीवर पोहोचलेला आहे. केवळ शहरासाठी पाणी राखीव ठेवल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या पूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी दरमहा १ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, हे पाणी राखीव ठेवल्यास जुलै अखेरपर्यंत हे पाणी शहरास पुरेल एवढे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
खडकवासला प्रणालीत ९.६२ टक्के पाणी शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 2:11 AM