---
शिरूर : शिरूर शहरातील नगरपरिषदेच्या बायपास रस्त्यावरील कचरा संकलन केंद्रावर (डेपो) कचरा वेगळा करताना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना जिलेटिनचा स्फोट करण्यासाठी लागणारे डिटोनेटरचे ९८ नग सापडले त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी कचरा संकलन केंद्रावरील कर्मचारी घंटागाडीमधून आलेला कचरा वेगळा करत असताना हे त्यांना डिटोनेटरसदृश काही वस्तू सापडल्या. या काही वेगळ्या वस्तू असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याची चौकशी केली त्यावेळी ती स्फोटकांसाठी वापरले जातात, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही माहिती स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांना दिली. त्यामुळे बर्गे यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांना संपर्क करून याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कचरा डेपोवर धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर आदीनी याबाबत माहिती घेऊन त्याचा पंचनामा करून ताब्यात घेतले. हे डिटोनेटरचे बॉम्बशोधक पथक व श्वानपथकाच्या साह्याने त्याची तपासणी करून ते सुरक्षित जागी सील करून ठेवण्यात आले आहे.
डिटोनेटरच्या ९८ नग याठिकाणी एका बॉक्समध्ये आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. डिटोनेटरचा वापर विहीर खोदण्यासाठी व खाणकामासाठी केला जातो. विहिरीजवळील कचरा संकलन करताना कचरा गाडीतून डिटोनेटरचा हा बॉक्स कचरा संकलन केंद्रावर आला असावा, असा अंदाज पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी व्यक्त केला. याबाबतचा अधिक तपास प्रभारी उपविभागीय आधिकारी अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव व हनमंत पडळकर करत आहेत.