पुणे : एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी दिलेल्या दोघांनी (कस्टोडियन) कंपनीतून पैसे तर घेतले़. पण, त्यातील काहीच रक्कम एटीएम मशीनमध्ये भरुन उरलेली रक्कम हडप केली़. खडकी येथील सिक्युरिटी ट्रान्स इंडिया प्रा़. लि़ या कंपनीला दोघांनी तब्बल ९९ लाख ५६ हजार ६०० रुपयांना चुना लावून ते फरार झाले आहेत़. राकेश वसंत जोशी (वय ३४, रा़ हिरकणी सोसायटी, शिंदेनगर) आणि सुयश किशोर पवार (वय ३३, रा़ वाघोली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांचीन नावे आहेत़. याप्रकरणी सिक्युरिटी ट्रान्स इंडियाचे अधिकारी शैलेश डाहाके (वय ३४, रा़. वारजे) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिक्युरिटी ट्रान्स इंडिया या कंपनीकडे वेगवेगळ्या बँकांमधील एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये रोख रक्कम जमा करण्याचे काम देण्यात आले आहे़. कंपनीकडे हे काम करणारे २२ कस्टोडियन आहेत़. एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी त्यांनी त्यांना रुट ठरवून दिले आहेत़. त्यानुसार राकेश जोशी आणि सुयश पवार यांच्याकडे क्रमांक १० चा रुट दिलेला होता़. यामध्ये दौंड, यवत, थेऊर व त्या परिसरातील १३ एटीएम मशीनमध्ये त्यांना पैसे भरण्यासाठी रक्कम दिली जात असे़. या दोघांनी क्रमांक १० च्या मार्गावरील १३ मशीनपैकी बँक ऑफ महाराष्ट्र व आयसीआयसीआय बँकेच्या एकूण ११ एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये पैसे भरताना काहीच रक्कम मशीनमध्ये भरली़. मात्र, आपल्या अकाऊंटमध्ये नोंद करताना सर्व रक्कम भरल्याची नोंद केली़. असा प्रकार अनेक दिवस केल्यानंतर ४ ऑक्टोंबर २०१९ पासून ते दोघेही अचानक कामावर येणे बंद झाले़. त्यांचा काहीही पत्ता लागत नव्हता़. त्यामुळे कंपनीला संशय आल्याने कंपनीने त्यांनी भरलेले एटीएममध्ये भरलेले पैसे व अकाऊंटमध्ये दाखविलेले पैसे याचे ऑडिट केले़. त्यात त्यांनी एटीएम मशीनमध्ये दिलेले पूर्ण पैसे न भरता ९९ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले़. त्यानंतर कंपनीच्या वतीने खडकी पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे़. पोलीस निरीक्षक शफिल पठाण अधिक तपास करीत आहेत़.
एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांनीच लावला ९९ लाखांना चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 4:22 PM