भोर (पुणे) : तालुक्यातील भाटघर धरणात ९९.७१ टक्के पाणीसाठा, तर नीरा देवघर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.२९ पाणीपुरवठा कमी आहे. ब्रिटिशकालीन भाटघर धरण ९९.७१ टक्के, नीरा देवघर धरणात १०० टक्के, तर वीर धरणात ६१.७३ टक्के, गुंजवणी ९७.६९ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. वीरवगळता सर्व धरणे १०० टक्के भरलेली आहेत. मागील वर्षीसुद्धा धरणे १०० टक्के भरलेली होती. भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.
यातील बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्याला भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी धरणाचे पाणी वीर धरणातून डाव्या, उजव्या कालव्यातून जाते. शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडले जाते. तालुक्यात सध्या दुष्काळ जाहीर झाला आहे. दरम्यान, भोर आणि वेल्हे तालुक्यात भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी या धरणात जवळपास ३९ टक्के पाणीपुरवठा आहे. मात्र दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात धरणे १०० टक्के भरतात आणि उन्हाळ्यात रिकामी होतात. भोर, वेल्हे तालुक्यात सदर धरणातील पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. मात्र पुरंदर तालुक्यात ५८१.३८ हेक्टर क्षेत्र, बारामती २६,९१७ हेक्टर, इंदापूर ४१,२६७.६२ हेक्टर असे एकूण ६८,७८७ लागवडीखालील क्षेत्र तर सिंचन क्षेत्र ३७,०७० हेक्टर असे एकूण ७८,३३७.६२ हेक्टर क्षेत्र आहे. तरीही तीनही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे.
भात उताऱ्याला बसणार फटका -
भोर व वेल्हे तालुक्यात शेवटचा पाऊस पडला नाही. त्यामुळे इंद्रायणी भात पळंजावर गेले असून, शेतकऱ्यांचा भाताचा उतारा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याबाबत शासनाकडे मागणी करूनही भोरला दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्ती करीत असून, फक्त धरणे भरली म्हणून पाऊस झाला असा निकस काढला जात आहे की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.