पुणे : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असणारी खडकवासला येथील दहावीत शिकणारी मुलगी इमारतीच्या डक्टमधील मोकळ्या जागेत मृतावस्थेत आढळून आली. हीना शब्बीर पठाण (वय १६, रा. चिंतामणी हाइटस्, खडकवासला) असे मृतावस्थेत सापडलेल्या मुलीचे नाव आहे.
दुर्गंधी येत असल्याने चिंतामणी हाइटस्मधील एका रहिवाशाने खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा डक्टमधील मोकळ्या जागेत एक मुलगी मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढाेले, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक निरीक्षक नितीन नम आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाला कळविण्यात आली. नांदेड सिटी अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुजित पाटील आणि जवान शनिवारी सकाळी इमारतीच्या आवारात आले. दोरीचा वापर करून जवानांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटत नव्हती.
दरम्यान, हीना २९ मार्च रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे दिली होती. हीना मृतावस्थेत सापडल्यानंतर हीनाचा मृतदेह ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. वरून पडल्याने जखमा होऊन तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. हीनाची सध्या दहावीची परीक्षा सुरू हाेती. अभ्यासात ती हुशार होती. सर्व शक्यता लक्षात घेऊन हवेली पोलीस तपास करीत आहेत.