पुणे : अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्या मित्राने पळवून नेले. पोलिसांनी तिला परत घरी आणले. तेव्हा तिची वैद्यकीय तपासणी करताना तिच्यावर शेजारी राहणाऱ्या तरुणाने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिच्या शेजारी राहणाऱ्या २५ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती कार्यक्रमासाठी शाळेत साडी नेसून गेली होती. शाळेतून घरी येऊन साडी बदलत असताना तिच्या शेजारी राहणारा तरुण घरात शिरला व तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर बऱ्याच वेळा त्याने तिच्यावर अत्याचार करून ही बाब कोणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.
दरम्यान, फिर्यादीला तिच्या मित्राने फूस लावून मुंबई येथे पळवून नेले होते. फिर्यादीच्या वडिलांनी स्वारगेट पोलिसांकडे त्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी या मुलीचा शोध घेऊन तिला परत आणले. तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. यावेळी डॉक्टरांनी चौकशी केल्यावर तिने शेजारी राहणाऱ्या तरुणाने अनेक वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या तरुणाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.