शिवणे (पुणे) : दोन इमारतींच्या मधील कम्पाउंड तारेचा शॉक लागून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शिवणे परिसरात घडली. मंगळवार, २७ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शुभम बाळू इंगोले (वय १६, रा. ढोणे हाईट्स, शिंदे पूल शिवणे) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
शिवणे शिंदे पूल परिसरातील सोसायटीमध्ये राहणारा शुभम हा शिवण्यातील नवभारत हायस्कूल शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. सकाळी ११ वाजता शाळेत जातो, असे सांगून घराबाहेर पडला. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता शिवणे देशमुखवाडी येथील सद्गुरू कृपा बिल्डिंग व जावळकर प्रेस्टीज या दोन इमारतींमधील चार फुटांच्या गल्लीमधून शुभम त्याच्या मित्राकडे जात असताना येथील लोखंडी जाळीला शुभमचा हात लागून त्याला जोराचा विजेचा शॉक लागला. शॉक लागल्याने शुभम काही वेळ जाळीला चिकटून खाली पडला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, शुभमचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिस तसेच महावितरणचे अधिकारी व इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला असून, पुढील तपास उत्तमनगर पोलिस करीत आहेत.