पुणे: रस्ता अपघातात जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याला डाॅक्टरांनी ब्रेन डेड घाेषित केले. त्याच्या कुटुंबीयांनी अवयदानाला परवानगी दिल्याने त्याचे यकृत, दाेन्ही किडन्या व दाेन काॅर्नियाचे दान केले. सन २०१६ नंतर ससून रुग्णालयातून हे १२ व्या पेशंटचे अवयवदान असून, त्यांच्याद्वारे आतापर्यंत ५८ विविध अवयवांचे दान करण्यात आले आहे.
हा तरुण खेड तालुक्यातील राजगुरूनगरच्या दाेंडे गावचा रहिवासी आहे. त्याचा परिसरात दुचाकीवरून जाताना अपघात झाला व डाेक्याला जबर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात ८ डिसेंबरला दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्याला डाॅक्टरांच्या पथकाने १० डिसेंबरला मेंदू मृत, म्हणजे ब्रेनडेड घाेषित केले. त्यावेळी त्याचे अवयवदान करण्याबाबत ससून रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे, जगदीश बाेरूडे, अरुण बनसाेडे आणि सिमरन सचदेवा यांनी समुपदेशन केले असता घरच्यांनी अवयवदानाला परवानगी दिली.
त्यानंतर त्याचे यकृत रुबी हाॅल क्लिनिकमधील ६६ वर्षीय पुरुष रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले, तर एक किडनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ३५ वर्षीय महिलेवर आणि दुसरी किडनी नाशिकमधील अपोलो रुग्णालयातील ५० वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आली. त्याचे दाेन्ही डाेळ्यांच्या बाहुल्या या ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी देण्यात आल्या, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
हा तरुण मजुरीची कामे करत हाेता. ताे घरच्या एकुलता एक कमावता हाेता. त्याच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, आई, वडील असा परिवार आहे. हे प्रत्यारोपण ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. भारती दासवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरीकरण शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डाॅ. संयोगीता नाईक व पथक, नर्सिंग स्टाफ सुनिता गायकवाड, न्याय वैद्यकचे डाॅ. हरिश ताटिया, सर्जरी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. किरणकुमार जाधव, न्यूराेसर्जन डाॅ. संजीव व्हाेरा, मेडिसिनच्या डाॅ. सोनल साळवी यांनी व पथकाने केले.
ससूनमधील २०१६ पासून आतापर्यंत एकूण १२ अवयवदात्यांनी अवयवदान केले
हृदय - ५यकृत - १०किडनी - १८काॅर्निया - २२एकूण अवयव व टिश्यूंचे दान - ५८