पुणे : पुणे महापालिका आता मंडईमध्ये ग्राहकांची गर्दी वाढावा यासाठी भाजी विक्रीसह इतर वस्तू विक्रीलाही परवानगी देण्यात येणार आहे. त्याचवेळी रेडिरेकननुसार मंडईच्या गाळ्यांचे मूल्यांकन केले असून, त्यामध्ये २६ पटीने भाडेवाढ सुचविली आहे. पूर्वी एका गाळ्याला प्रति महिना केवळ ३२ रुपये भाडे होते. आता हे भाडे ८४५ रुपये होणार आहे. व्यावसायिकांनी भाडेवाढीस विरोध केला होता. पण प्रशासनाने ही वाढ कायम ठेवून याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
पुणे शहरात महात्मा फुले मंडईही सर्वात जुनी मंडई असून, तेथे तब्बल १६०० गाळे आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराच्या विविध भागात ३१ ठिकाणी मंडई बांधलेल्या आहेत. तेथे सुमारे १४०० गाळे आहेत. हे गाळे भाजी व फळ विक्रेत्यांना भाड्याने दिले गेले आहेत. २००४ मध्ये शेवटची भाडेवाढ झाली असून, त्यानंतर यात वाढ झालेली नाही. सध्या एका गाळ्याला प्रतिमहा ३२ रुपये भाडे असल्याने त्यातून वीज, स्वच्छता, देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून सर्व मंडईचे मूल्यांकन करून घेऊन त्यांचे भाडे निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने हा प्रस्ताव तयार केला आहे.
भाडे माफ करण्याचा घेतला निर्णय
पुणे महापालिकेने कोरोना काळात शहरातील मंडई बंद असल्याने त्या काळातील भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाळांच्या भाडेकरूना दिलासा मिळाला आहे.
अशी होणार भाडेवाढ
-२०१९-२० चे एका गाळ्याचे मासिक भाडे ३२ रुपये- २००८ च्या नियमावलीनुसार गाळ्याचे मूल्यांकन केले-मूल्यांकनासाठी आलेला दर ६१८ रुपये अधिक कर २२७ रुपये असे एकूण ८४५ रुपये- चार वर्षात ८ पट भाडेवाढ केली जाणार- २०२१-२२ ला पाच पट भाडेवाढ - ५२७ रुपये प्रतिमहा- २०२२-२३ ला सहा पट भाडेवाढ -६३४ रुपये प्रतिमहा-२०२३-२४ ला सात पट भाडेवाढ - ७३९ रुपये प्रतिमहा- २०२४-२५ ला आठ पट भाडेवाढ - ८४५ रुपये प्रतिमहा
भाडेवाढीचे टप्पे ठरले
मंडईच्या गाळाच्या मासिक भाडयाच्या वाढीसाठी नवीन मूल्यांकनानुसार टप्पे ठरवले असून, २०२१ ते २०२५ पर्यंत पाच पट, सहा पट, सात पट आणि आठ पट असे भाडे आकारले जाणार आहे. तर २०२५-२६ पासून दरवर्षी १२ टक्के भाडेवाढ केली जाणार आहेत. तसेच २०२१-२२ पासून ३० वर्षासाठी गाळा देण्याचा करार करण्याची परवागनी देण्यात आली आहे.