Pune Crime Live in Partner case : आधी लिव्ह पार्टनरची हत्या केली. तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या खंबाटी घाटात नेऊन पुरला. त्यानंतर घरी येऊन तीन वर्षाच्या मुलाला आळंदीत सोडून दिलं. आरोपी इथंच थांबला नाही, तर हे सगळं प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही त्याने पोलीस ठाण्यात दिली. आणि तिथूनच त्यांने केलेल्या हत्येचा उलगडा होण्यास सुरूवात झाली. लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर वाकड पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय आरोपीचे नाव दिनेश पोपट ठोंबरे असे असून, हत्या करण्यात आलेल्या लिव्ह इन पार्टरनचे नाव जयश्री विनय मोरे (वय २७ वर्ष) असे आहे. त्यांना एक तीन वर्षाचा मुलगाही आहे.
जयश्री मोरे मूळची बीड जिल्ह्यातील परळीची होती. लग्नानंतर सहा महिन्यातच ती पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर तिचे एका कंपनीत सुपरवायझर असलेल्या दिनेश ठोंबरेसोबत प्रेमसंबंध जुळले. मागील पाच ते सहा वर्षांपासून ते लिव्ह इन मध्ये राहत होते.
दिनेश ठोंबरे विवाहित असून, त्याची पत्नी आणि मुलगा मावळ तालुक्यातील भोर येथे राहतात. सुपरवायझर म्हणून काम करण्याबरोबरच त्याचा हिंजेवाडीमध्ये चहाचे हॉटेलही आहे. ते दोघे मारूंजी येथे भाड्याने घेतलेल्या घरात वास्तव्याला होते.
लिव्ह इन पार्टनरची हत्या, काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी दिनेश ठोंबरे हिंजेवाडी पोलीस ठाण्यात आला. त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. भूमकर चौक परिसरातून बेपत्ता झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, तो मुलगा आळंदीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीने फक्त मुलगा बेपत्ता झाल्याचेच पोलिसांना सांगितले. लिव्ह इन पार्टनरबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर आरोपी आळंदीला गेला. त्यावेळी पोलिसांना कळलं की मुलाची आईही बेपत्ता आहे. पोलिसांनी त्या मुलाला दिनेश ठोंबरेंच्या ताब्यात दिले नाही.
जयश्री मोरे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास पोलिसांनी दिनेश ठोंबरेला सांगितले. याच दरम्यान पोलिसांनी मुलाच्या आजोबांना कॉल करून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. २६ नोव्हेंबर रोजी आरोपी ठोंबरे वाकड पोलीस ठाण्यात आला आणि लिव्ह इन पार्टनर बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
खंबाटी घाटात ट्रक चालकाला दिसला जयश्रीचा मृतदेह
२६ नोव्हेंबर रोजी खंबाटी घाटात थांबलेल्या एका ट्रकचालका झुडुपांमध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. त्याने याची माहिती खंडाळा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. महिलेच्या अंगावर जखमी होत्या.
दिनेश ठोंबरे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, पण पार्टनरची तक्रार का दिली नाही? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश ठोंबरेचा मोबाईल रेकॉर्ड तपासला. त्यात २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरच्या काळात त्याचा मोबाईल ठराविक काळात स्वीच ऑफ होता.
बुधवारी म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी खंबाटी घाटात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती सातारा पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली. तक्रारीत दिलेली माहिती आणि बेपत्ता महिलेचे मंगळसुत्र, मृतदेह सारखाच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश ठोंबरेला पोलीस ठाण्यात आणले आणि चौकशी केली. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच आरोपीने जयश्री मोरेच्या हत्येची कबुली दिली. वाकडमधील भूमकर चौकात सर्व्हिस रोडवर जयश्रीच्या डोक्यात हातोडी मारल्याचे आरोपीने कबूल केले.
जयश्रीची हत्या का केली?
२४ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने जयश्रीची हत्या केली. त्यानंतर खंबाटी घाटात नेऊन तिचा मृतदेह फेकला. जयश्रीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय दिनेश ठोंबरेला होता. ती आरोपीकडे पैसे मागायची. पैसे नाही दिले तर ब्रेकअप करण्याची धमकी द्यायची. इतकंच नाही, तर आपल्यातील नात्याबद्दल तुझ्या घरच्यांनाही सांगेन, असे ती म्हणत होती.
२४ नोव्हेंबर रोजी भूमकर चौकात सर्व्हिस रोड कारमध्ये बसलेले असतानाच दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यांचा मुलगाही कारमध्ये होता. वाद वाढल्यानंतर दिनेश ठोंबरे गाडीतील हातोडी काढली आणि जयश्री मोरेच्या डोक्यात मारली. तिचा मृतदेह खंबाटी घाटात फेकला. त्यानंतर कार्तिकी निमित्त आळंदीत खूप गर्दी होती. त्यावेळी त्याने मुलाला पोलिसांच्या पथकाजवळच सोडलं. आणि नंतर हिंजेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला.