लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यावर्षी पुणे शहरात प्रथमच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळला आहे. ‘जेई’ची बाधा झालेल्या वडगाव शेरी येथील चार वर्षांच्या बालकावर ३ नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, त्यानुसार आराेग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप व डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
या आजारामध्ये रुग्णाच्या मेंदूला सूज येते. ताप, डोकेदुखीही असते. त्याचा प्रभाव १ ते १५ वर्षांच्या वयाेगटांतील बालकांमध्ये जास्त आढळतो. प्रमुख्याने विदर्भात त्याचे रुग्ण आढळून येतात. पुणे जिल्ह्यातही पाच वर्षांपूर्वी त्याचे रुग्ण आढळले हाेते. या बालकाला नाेव्हेंबरच्या सुरुवातीला ताप व डाेकेदुखी अशी लक्षणे हाेती. ताप वाढून त्याला तापाचा झटका आला. त्यात त्याचा एक हात व पाय कमकुवत झाला. त्याला सुरुवातीला खासगी व नंतर ससून रुग्णालयात पाठविले.
‘जेई’च्या विषाणूचे डुकरांमध्ये वास्तव्य ‘जेई’चे विषाणू हे बाधित डुकरांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात; पण त्याचा त्यांना कोणताही त्रास होत नाही डुकरांना याचा वाहक म्हणतात. डुकरांना डास चावला व तो बालकाला चावल्यास त्याचा प्रसार होतो.