दौंड (पुणे) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या खातेदाराची १ लाख ६० हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी काळुराम अर्जुन मोरे (रा. वायरलेस फाटा, गिरीम, दौंड) यांनी दौंड पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
व्यापार पेठेतील वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेतूनच चोरट्याने पैशाची बॅग चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. २८) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथील स्टेट बँकेच्या शाखेत सदरची घटना घडली. फिर्यादी यांनी येथील कॅनरा बँकेतून ९० हजार रुपये तसेच स्टेट बँकेतून ७० हजार रुपये काढले, असे एकूण एक लाख साठ हजार रुपये त्यांनी एका बॅगेत ठेवले. व स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतील काउंटरच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसून बँक अधिकारी यांच्याशी बँक पुस्तक व एटीएमबाबत ते चौकशी करत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आपल्याकडील पैशाची बॅग खुर्ची शेजारीच ठेवलेली होती. दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची नजर चुकवून पैशाची बॅग लंपास केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, ही घटना पाळत ठेवून केली असल्याचे बोलले जात आहे. याबाबतची नाेंद पोलिसांत झाली आहे.