सोमेश्वरनगर (पुणे) : सद्या राज्यात चाललेल्या सत्तासंघर्षात साहेब की दादा या द्विधा मनस्थितीत सापडलेले पदाधिकारी व कार्यकर्ते हळूहळू आपली भूमिका उघड करू लागले आहेत. परवा बारामतीशरद पवार यांच्या समर्थनार्थ एक फ्लेक्स झळकला होता. आज वाणेवाडी याठिकाणी शरद पवार यांच्या समर्थनार्थ वाणेवाडी येथे तालुक्यातील दुसरा तर पाश्चिम भागातील पहिला फ्लेक्स झळकला आहे.
बारामतीच्या पश्चिम भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बहुतांश कल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच असून त्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे जुन्या जाणकारांनी तालुक्यासह राज्यात दोन्हीही पवारांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मतदार मात्र अजूनही बुचकळ्यात पडले असल्याचे चित्र तालुक्यात आहे. पदाधिकारी मात्र कात्रीत सापडले असून काहींनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या समर्थनार्थ येथील सुलतान ग्रुपच्या वतीने गुरुवारी गुणवडी चौकातील काँग्रेस कमिटी समोर बॅनर लावण्यात आला होता. त्यावर बारामती नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने तो बॅनर उतरविण्याचा पवित्रा घेतला. याबाबत माहिती समजताच टिपू सुलतान ग्रुपच्या सदस्यांनी शहरात लागलेल्या सर्व बॅनरवर कारवाई करा, मग आमचा बॅनर उतरवा. हा पवित्रा घेतल्यावर ही कारवाई टळली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सर्व बॅनरवर बारामती नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला. सर्व बॅनरबरोबर शरद पवार यांचा बॅनरदेखील काढण्यात आला.
आज तालुक्यातील वाणेवाडी येथे सिनेमा चौकात सकाळी नऊ वाजता शरद पवार यांना पाठिंबा दर्शवणारा बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर वीरेंद्र आप्पासाहेब जगताप यांनी लावला आहे. यावर बॅनरवर संभ्रम कशासाठी...माझ्यासाठी फक्त आणि फक्त साहेब..असे लिहण्यात आले आहे.