पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुढीपाडवा आणि ठाण्यातील सभेत त्यांनी भोंग्यावर विशेष लक्षकेंद्रित केले आहे. ठाण्यातील सभेत राज यांनी मशिदीवरचे भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा देशभरात हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत मुस्लिम बांधवानी भोंग्यांबाबत आमचे ऐकावे अन्यथा हनुमान चालीसा लावली जाईल. अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. परिषेदत अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. राज्यभरात त्यानंतर बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. पुण्यात चक्क राज ठाकरेंनी स्वतः काढलेल्या एका व्यंगचित्राचे बॅनर झळकले आहे. शहरातील अलका टॅाल्कीज चौक, गुडलक चौक, कोथरुड येथील करिष्मा चौक येथे लावण्यात आले आहेत.
''अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव साहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व असा मजकूर बॅनरवर लिहण्यात आला आहे.''
राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ५ जुनला अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. राज यांच्या या भूमिकेवर अजूनही टीका टिप्पणी चालू आहे. विरोधी पक्षांनी आरोप केले आहेत. तर काहींनी त्यांना समर्थनही दाखवलं आहे. पुण्यात सध्या बॅनर्सची चर्चा रंगली आहे. हे कोणी लावले याबद्दल अद्याप काही कळू शकले नाही.