पुणे : दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. अक्षय कांबळे (२५, रा. ऋतुजा अपार्टमेेंट, धायरी-नऱ्हे रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर गौरव वामन चव्हाण (२१, रा. समर्थनगर, हिंगणे, सिंहगड रस्ता), हेमंत पांडुरंग राठोड (२१, रा. गणेशमळा, सिंहगड रस्ता ) आणि ऋतिक दिलीप कांबळे (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. अक्षयने याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सोमवारी रात्री दांडिया खेळण्यासाठी गेला होता. दांडिया खेळताना हातातील काठी आरोपी गौरवला लागल्याने त्याचा आरोपींशी वाद झाला. रात्री अक्षय आणि त्याचा मित्र आदित्य भोजने दुचाकीवरून नऱ्हे-धायरी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी अक्षय आणि आदित्यला अडवले. त्यांना शिवगाळ करुन मारहाण केली. अक्षयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. अन्य पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश गोसावी करत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.