वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 04:48 PM2024-04-06T16:48:17+5:302024-04-06T16:49:37+5:30
पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली...
पुणे :शिरूरलोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारीबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या त्यांच्या उमेदवाराचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. शिरूरमधून मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने संधी दिली होती. पण त्यांनी पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती वंचितच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून दिली.
म्हणून केली कारवाई...
सोशल मिडियावर पोस्ट करत माहिती देण्यात आली. यामध्ये म्हटले आहे की, 'वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.'
सुप्रिया सुळेंना विरोध करणे पडले महागात-
मंगलदास बांदल यांच्या तिकीटानंतर शिरूरच्या निवडणुकीला चांगला रंग आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अमोल कोल्हे तर वंचितकडून बांदल उभे होते. या निवडणुकीत बांदल हे निर्णायक मते घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण पक्षविरोधी कृती केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. आता ही निवडणूक आढळराव पाटील विरुद्ध कोल्हे होणार की वंचित दुसरा उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात काम केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे वंचितकडून सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली. वंचितने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या असून उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. वंचितने तिसऱ्या यादीत पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे तर शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांना मैदानात उतरवलं होते.
मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 6, 2024
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला… pic.twitter.com/10dAZddNKI
गुन्हेगारी पार्श्वभूमी-
पैलवान असलेले मंगलदास बांदल हे कायमच वादात राहिले आहेत. ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राहिलेत. मंगलदास बांदल हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कही चांगला होता. मात्र विविध गुन्हे दाखल झाल्याने ते कायमच वादग्रस्त ठरलेत. जिल्हा बँकेत केलेल्या कथित फसवणूक प्रकरणात ते जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते. मागच्या वर्षीच त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. तसेच फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आता वंचितने उमेदवारी रद्द केल्याने ते अपक्ष लढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.