Supriya Sule ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा होत असलेल्या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात असल्याने अटीतटीचा सामना रंगत आहे. बारामतीचं मैदान जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने शर्थीचे प्रयत्न केले जात असताना सुप्रिया सुळे यांनी आज निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या चार तालुक्यांमध्ये संवेदनशील स्थिती असून या तालुक्यांतील मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यांचीही व्यवस्था केली जावी, अशी मागणी सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.
"बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि खडकवासला या तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रियेवेळी गैरप्रकार होऊ शकतात. हे प्रकार रोखण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना कॅमेरेही उपलब्ध असावेत," अशी सुप्रिया सुळे यांची मागणी आहे. तसंच पोलीस प्रशासनानेही अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वीही निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध नेत्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दमदाटी करत असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता मतदानाच्या आदल्या दिवशी सुळे यांनी थेट मतदान केंद्रावर कॅमेरे उपलब्ध करण्याची मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामतीत कशी पार पडणार मतदान प्रक्रिया?
बारामती लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५१६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, आवश्यक सोयीसुविधा दिल्या आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती बारामती लाेकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.
येथे शोधा मतदान केंद्र आणि नाव
मतदारांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
बारामती लाेकसभा निवडणूक
एकूण मतदार : २३ लाख ७२ हजारमतदान केंद्र : २ हजार ५१६सर्वाधिक मतदान केंद्र : भोर (५६१)
४१ ठिकाणी सहापेक्षा जास्त केंद्रांची संख्या
एकाच ठिकाणी सहा पेक्षा जास्त मतदान केंद्रांची संख्या ४१ आहे. त्यामध्ये सर्वाधिक २६ केंद्र खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यापाठाेपाठ पुरंदर- ८, दाैंड- ४ आणि इंदापूर, बारामती आणि भाेर मतदारसंघात प्रत्येकी एक केंद्र आहे.