पुणे : ‘शहरातील कार्यकारिणीमध्ये सर्व घटकांतील ज्येष्ठ, महिला, पुरुष, युवक युवती, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी करून सर्वांना काम करण्याची योग्य संधी देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पुणे शहरात पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे धोरण आणि भूमिका ही पुणेकरांचे हित लक्षात घेऊनच असणार आहे. पुणे शहरातून मोठी ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी उभी केली जाईल’, असा निर्धार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
शहर राष्ट्रवादीची पहिली कार्यकारिणी शहराध्यक्ष मानकर यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, कार्याध्यक्षा पूनम पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, माजी सभागृहनेते सुभाष जगताप, शंकर केमसे, अप्पा रेणुसे, बंडू गायकवाड प्रकाश कदम, महेश शिंदे, बाळासाहेब बोडके, प्रदीप गायकवाड, प्रिया गदादे, भैय्यासाहेब जाधव, सदानंद शेट्टी, बाबा पाटील यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नवीन कार्यालय वैयक्तिक नाही तर पक्षाच्या नावेच असेल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर कार्यालय नव्याने उभे केले जात असून ते माझ्या वैयक्तिक नाही तर पक्षाच्या नावेच असेल, ही हमी देतो असे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी सांगितले.