पुणे : पुणेपोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात सुरू केलेल्या धडाकेबाज कामगिरीत या रॅकेटचा सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे समोर आले आहे. हा संदीप धुनिया २०१६ मध्ये महसूल गुप्तचर संचलनालयाने केलेल्या कारवाईतदेखील मुख्य आरोपी होता. ही कारवाईदेखील त्यावेळी कुरकुंभ एमआयडीसीमध्येच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी १५९ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते.
धुनियाकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याने, त्याला भारतात येण्यासाठी व्हिसाची गरज नाही. याच संधीचा फायदा घेऊन त्याने ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा धंदा सुरू केला होता. ३० जानेवारी रोजी संदीप नेपाळ-काठमांडूमार्गे कुवेतला पळाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. धुनिया मूळचा बिहार, पाटणा येथील आहे. त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. बिपिनकुमार त्याचा मित्र होता. तो सध्या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. सोनम पंडित ही बिपिनकुमारची पत्नी आहे. मात्र, धुनिया याने तिला आपली गर्लफ्रेंड बनवले. याबाबत बिपिनच्या वडिलांनी तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आतापर्यंत पोलिसांनी १७५० ते १८०० किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. तसेच, आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
विदेशात मेफेड्रॉनची विक्री करण्याची मदार धुनियावर होती. धुनिया यानेच मुंबईतील एका व्यक्तीशी संपर्क केला होता. तर अन्य आरोपी मकानदार हा धुनियासोबत २०१६च्या ड्रग्जच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जेरबंद होता. पोलिसांनी या रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी कंबर कसली आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि. २२) ‘एनसीबी’चे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) एक पथक पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. यासोबतच ड्रग्ज नेटवर्कमध्ये दहशतवादी संघटना देखील यापूर्वी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने एटीएस, एनआयए या तपास यंत्रणांनीदेखील याप्रकरणी तपास सुरू केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
असा झाला अनिल साबळे श्रीमंत
कुरकुंभ येथील अर्थकम कंपनीचा मालक मूळ श्रीगोंदा तालुक्यातील असून, त्याने १५ वर्षांपूर्वी कुरकुंभ एमआयडीसी येथे कंपनी सुरू केली. साबळे हा सुरुवातीला कंपनीत दुचाकीवरून ये-जा करायचा. मात्र, अल्पावधीतच त्याच्याकडे आलिशान चारचाकी गाड्या आल्या. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये त्याने श्रीमंतीचे कळस गाठले, त्याचा हा दुचाकी ते महागड्या चारचाकी पर्यंतचा प्रवास ड्रग्जच्या माध्यमातूनच झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.