मांडवगण फराटा : बिबट्याने मुलावर हल्ला केलेल्या परिसरातील गोकुळनगर या रस्त्यावर रात्रीच्या वेळी दोन बिबटे दुचाकीच्या पाठीमागे धावत असल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होऊ लागला आहे. दुचाकीच्या पाठीमागे दोन बिबटे धावत आहेत. दुचाकीस्वार गाडीचा हॉर्न जोरजोराने वाजवत त्या ठिकाणावरून आपला जीव मुठीत धरून पुढे गेला आहे. त्यामुळे नक्की अजून या परिसरामध्ये बिबटे किती आहेत? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
बिबट्याने मुलावरती हल्ला केल्यानंतर प्रशासन कामाला लागले. ठिकठिकाणी पिंजरे लावले. शोधाशोध सुरू झाली. मगं पिंजऱ्यामध्ये बिबट्या का अडकत नाही हा मोठा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. बिबट्याने मुलावर हल्ला करून ठार केलेली घटना होऊन महिना झाला मात्र अद्याप वनविभागाने गांभीर्याने घेतलेले दिसून येत नाही. वनविभागाने लगेच बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे होते. मात्र मांडवगण फराटा येथे घडलेल्या घटनेबाबत वनविभाग गांभीर्याने का घेत नाही, बिबट्याला का पकडत नाही. हा मोठा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. शिरूरच्या पूर्व भागामध्ये दररोज कुठे ना कुठे नागरिकांना रात्री तसेच दिवसाही आता बिबट्या दिसून येत आहे. मात्र एकही बिबट्याला वनविभागाने पकडले नाही. या परिसरामध्ये ऊस तोडण्यासाठी अनेक मजूर बाहेरगावावरून आले आहेत. त्या ऊस मजुरी करणाऱ्या कामगारांना देखील बिबट्याच्या संदर्भात काही माहिती नसते त्यामुळे ते बिनधास्तपणे ऊस तोडत असतात परंतु अचानक अनेकवेळा बिबट्यासमोर दिसून आले आहेत.
ऊसतोड कामगार ऊस तोडण्यामध्ये व्यस्त असतात. तसे त्यांची मुले देखील उसाच्या फडामध्ये कुठेही खेळत असतात. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सागर फराटे म्हणाले की, मांडवगण फराटा येथील घटनेला एक महिना होत आला तरी मात्र अद्याप वनविभागाला बिबट्या सापडला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याच परिसरामध्ये अनेक नागरिकांना बिबट्या निदर्शनात आला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणे देखील अवघड झाले असून बिबट्याला लवकर जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.