पुण्यातील भाजपच्या आमदाराने पोलिसाच्या आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:49 PM2024-01-05T12:49:47+5:302024-01-05T12:55:37+5:30
हा सगळा प्रकार ससून रुग्णालयात अजित पवार यांच्या पाहणी दरम्यान घडला....
पुणे : पुण्यातील भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी थेट एका पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली लगावली. तसेच राष्ट्रवादीच्या वैद्यकीय सेलच्या अध्यक्षाला धक्काबुक्की करत कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार ससून रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दरम्यान घडला.
आज सकाळी ससून रुग्णालयात वॉर्डची पाहणी करताना वैद्यकीय मदत सेलचे जितेंद्र सुरेश सातव यांनी दोन वेळा आमदार कांबळे यांना धक्का दिला. त्याचबरोबर कांबळेंना बाजूला सरकण्यास सांगितल्याने त्यांनी सातव यांना मारहाण केली. दुसरा प्रकार म्हणजे अजित पवार यांच्या उपस्थितीत जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा दिलीप कांबळे हे मंचावरून खाली उतरत असताना त्यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली लगावली.
पोलिस कर्मचारी कार्यक्रमाठिकाणी ड्युटीवर असताना कांबळे यांना अचानक राग अनावर झाल्याने त्यांनी कानाखाली मारली. हा सर्व प्रकार ससून रुग्णालय परिसरात घडला. अजित पवार यांचा आज सकाळपासूनच पुण्यात विविध ठिकाणी दौरा सुरू आहे. पुण्यातल्या शासकीय ससून रुग्णालयात देखील विविध वॉर्डच उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काल अब्दुल सत्तार
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 5, 2024
आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज ...
भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी?
गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण… pic.twitter.com/j8QhIL6Nua
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, सह भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे हे उपस्थित होते.