पुणे : शहरात पावसाळ्यात खासगी मिळकतींमध्ये असलेल्या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर पडतात. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यापूर्वी अशी धोकादायक झाडे महापालिकेची परवानगी घेऊन छाटण्यात यावीत, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
शहरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा वादळी पाऊस होतो. त्यामुळे महापालिकेकडून एप्रिलपासूनच शहरातील धोकादायक झाडे काढण्यात येतात. मात्र, खासगी मिळकतींमधील झाडे महापालिका काढत नाही. ही झाडे संबंधित जागा मालकांनाच काढावी लागतात. त्यामुळे झाड जळाले असेल किंवा त्यावर रोग पडला असेल किंवा वादळवारा, आग, वीज किंवा मुसळधार पाऊस यामुळे पडण्याची शक्यता असते. मात्र, अनेकदा नागरिक महापालिकेस कल्पना देत नाहीत तर काही नागरिक परस्पर झाडाचा निपटारा करतात. ही बाब बेकायदेशीर असल्याने धोकादायक वृक्ष काढणे, फांद्या छाटण्याच्या परवानगीकरिता पावसाळी हंगामामध्ये पडलेल्या वृक्षांच्या फांद्या, वृक्ष त्वरित हलविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील वृक्ष अधिकारी यांच्याशी त्यांच्या पालिका संकेतस्थळावरील भ्रमणध्वनीद्वारे तसेच अग्निशमन विभाग - संपर्क १०१, ०२०-२६५६१७०६, ०२०-२६४५१७०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी केले आहे.