राष्ट्रवादीतील आमदारांच्या भेटीला लागला ब्रेक; नेत्यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांबाबत साशंकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 02:15 PM2023-08-17T14:15:31+5:302023-08-17T14:16:33+5:30

दौरा केल्यास पदाधिकारी, कार्यकर्ते येतील की नाही ही शंका आमदारांना भेडसावत आहे....

A break in the meeting of NCP MLAs; Skepticism towards activists due to unclear role of leaders | राष्ट्रवादीतील आमदारांच्या भेटीला लागला ब्रेक; नेत्यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांबाबत साशंकता

राष्ट्रवादीतील आमदारांच्या भेटीला लागला ब्रेक; नेत्यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांबाबत साशंकता

googlenewsNext

- दुर्गेश मोरे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने सगळीच राजकीय गणिते बदलली आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घडामोडींवर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सगळीकडे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही आमदार, पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला असला तरी ते अजूनही शरद पवार आमचेच असे सांगत आहेत. तर राहिलेल्यांची भूमिका अस्पष्ट आहे. या सगळ्या घडामोडींमुळे गेल्या दीड महिन्यांपासून आमदारांना मतदारसंघात भेटीगाठी घेणे अवघड झाले आहे. दौरा केल्यास पदाधिकारी, कार्यकर्ते येतील की नाही ही शंका आमदारांना भेडसावत आहे.

साधारण दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील अनेक मातब्बरांची झोप उडाली. राजकीय गणितेही बदलली आहेत. शरद पवार गट-काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असून महाविकास आघाडीची गाडी पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार गटात कोण आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. कारण भाजपच्या गोटात दाखल झालेली राष्ट्रवादीची सर्व नेतेमंडळीच शरद पवार आमचेच म्हणत आहेत. त्यामुळे दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही संभ्रमातच आहेत. नुकतीच शरद पवार आणि अजित पवार यांची उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे त्यात आणखी भर पडली आहे. म्हणजे राष्ट्रवादीत नक्की काय चाललंय याचा थांगपत्ता कोणालाच लागेनासा झाला आहे.

...त्यामुळे अजित पवार गट सत्तेत

भाजपने महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी अनेक नीतीचा वापर करत आहे; पण इथल्या पुरोगामी विचारापुढे कमळही हतबल झाले. महत्त्वाचे म्हणजे भाजप कोणतेही मिशन राबविताना पहिल्यांदा त्या भागाचा सर्व्हे करते आणि त्यानंतर पुढील वाटचाल करते. महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी त्याच पद्धतीचा मार्ग अवलंबला; पण सर्व्हेमध्ये भाजपच्या पदरी निराशाच पडली. राज्यात भाजपची सत्ता येणे कठीण असून आहे त्या संख्याबळात घट होण्याची शक्यता या सर्व्हेने वर्तवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ केले; पण राज्यातील मतदारांवर त्यांचा फारसा प्रभाव पडत नसल्याचेही समोर आल्याने अजित पवार यांना खिंडित गाठल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. यामुळे भाजपची राज्यात होणारी पडझड काहीअंशी कमी होईल. या डावानंतर मोठा चमत्कार झाला. अजित पवार यांच्यासह तब्बल ४० आमदार सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचा देखील यात समावेश असल्याने राष्ट्रवादी दुभंगली.

कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी आमदार धजावेनात

शरद पवार यांचे निकटवर्तीयसुद्धा अजित पवारांबरोबर भाजपमध्ये गेले आहेत. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे १० आमदार आहेत. त्यापैकी सहा आमदारांनी थेट अजित पवारांना पाठिंबा दिला खरा; पण तेही अजून म्हणतात की आमचे नेते शरद पवारच आहेत. या संभ्रमावस्थेमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर राहिलेले आमदार संभ्रमात आहेत. युवा तसेच ज्येष्ठ नेते हे शरद पवारांच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नक्की खरं काय याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळेना. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी आमदारांच्या गावभेटीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते-पाटील, दत्तात्रय भरणे हे भेटीगाठी घेताहेत; पण अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शरद पवार गटातील शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी मतदारसंघातील दौऱ्याचे नियोजन केले. त्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही निमंत्रण धाडले; पण यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते येतील की नाही तसेच मतदारांच्या समोर कोणत्या मुद्यावर जायचे असा प्रश्न पडल्याने दौऱ्यावरून युटर्न घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. केवळ अशोक पवारांचीच नाही तर दोन्ही गटातील आमदारांची वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट नसल्याने अशीच अवस्था झाली आहे.

बेनके, तुपेंचे टेन्शन वाढले

महाविकास आघाडीची सत्ता गेल्याने आमदारांची अवस्था बिकट झाली होती. शिंदे-भाजप सरकारने विरोधकांच्या निधीला कात्री लावली होती. मतदारसंघातील अनेक कामे थांबली होती. आगामी निवडणुकीत मतदारांसमोर जायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच राजकीय परिस्थिती बदलाचे वारे वाहू लागल्याने त्या दिशेने अजित पवारांसह सात आमदार तिकडे वळले. त्यानंतर अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासह अर्थखाते आले अन् भरघोस निधी वाटपाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केलेल्या डीपीसीच्या कामांनाही ब्रेक लावला. तर दुसरीकडे शरद पवार गटातील आमदारांनाही निधी दिला आहे. त्यामुळे सत्तेपुढे शहाणपण नाही हे मात्र पक्के झाले; पण तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनके आणि चेतन तुपे यांचे मात्र टेन्शन वाढले आहे. दोन्ही नेत्यांनी राजकीय दिशा दाखवल्याने आपण कोणाकडे जायचे असा यक्ष प्रश्न दोघांपुढे असून दोन्ही नेत्यांची भूमिका अस्पष्ट असल्याने दिवसेंदिवस टेन्शन वाढतच चालले आहे.

Web Title: A break in the meeting of NCP MLAs; Skepticism towards activists due to unclear role of leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.