पुणे: अयोध्येत कारसेवेत पडलेल्या जुन्या ढाच्याची एक वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी भारत इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. या विटेवर संशोधन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज यांनी मंडळाला २५ लाख रूपयांची देणगीही जाहीर केली.
मनसेचे बाळा नांदगावकर यांनी ही वीट राज यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ती राज यांना संशोधन मंडळात द्यायची होती, मात्र ते राहून जात होते. शनिवारी अचानक राज यांनी आपल्या मुंबईतील सहकाऱ्यांसमवेत मंडळाला भेट दिली. नांदगावकर व अविनाश अभ्यंकर यांच्यासह पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, संपर्क नेते बाबू वागसकर, किशोर शिंदे, अजय शिंदे, गणेश सातपुते व अन्य पदाधिकारी होते. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्याध्यक्ष इतिहास संशोधक पाडुरंग बलकवडे, बी. डी. कुलकर्णी व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
त्यांनी राज यांचे स्वागत केले. तब्बल दीड तास थांबून राज यांनी मंडळातील अनेक चित्र, ग्रंथ तसेच वस्तूंची पाहणी केली. मंडळाला भेट देण्याची फार इच्छा होती, मात्र ते राहून जात होते, आज ठरवून भेट झाली. मंडळाचे काम फार मोठे आहे, इतिहासाचे याच पद्धतीने जतन झाले तरच पुढील पिढीला त्याची माहिती होईल असे मत त्यांनी व्यक्त केली. मनसेचे पदाधिकारी जिर्णोद्धारासाठी प्रयत्नशील असलेल्या पुण्येश्वर व नारायणेश्वर या पुण्यातीलल जुन्या मदिरांची माहितीही यावेळी त्यांनी घेतली. मंडळाच्या वतीने राज यांना काही प्रसिद्ध ऐतिहासिक पत्रांच्या प्रती, मंडळाने प्रकाशित केलेली काही पुस्तके भेट देण्यात आली.