- कल्याणराव आवताडे
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत भाद्रपदी बैल पोळा सण साजरा केला. यंदा बैल पोळ्यावर प्राण्यामध्ये पसरत असलेल्या लम्पी रोगाचे संकट आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत मिरवणूक काढली. मिरवणुकीत सजीव बैलांचा वापर न करता फायबरच्या बैलांचा वापर करत परंपरा जोपासली. प्राण्यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी यावेळी बळीराजाला साकडे घालण्यात आले.
फायबरच्या बैलांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून मिरवणूक सुरू झाली. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर उन्हातान्हात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. वडगाव बुद्रुक येथील शेतकरी कांतिराम जाधव यांच्या पुढाकारातून ही पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण उपस्थित होते. युवराज जाधव, चैतन्य जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. बैल पोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमध्ये वडगाव बुद्रुकवासीयांना पारंपरिक लाकडी खेळ, ढोल लेझीम यांसह दांडपट्टाची प्रात्यक्षिके बघायला मिळाली. ४० वर्षांपासून जाधव कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा करतात. यंदा प्राण्यांवर रोगाचे संकट असले तरी परंपरेत खंड पडू न देता हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
४० वर्षांपासून आम्ही बैलपोळा सण उत्साहात साजरा करतो. आपल्या मुलांनाही संस्कृती, परंपरा याबाबत माहिती असली पाहिजे. लम्पी रोगाचे आलेले संकट दूर व्हावे, ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
- कांतिराम जाधव, शेतकरी, वडगाव बुद्रुक