पुणे : व्यावसायिकावर भरदिवसा कोयता, लोखंडी सळई व अन्य धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. त्याच्याकडील लॅपटॉप व रोख रक्कम चोरुन नेणा-या तिघांना विमानतळ पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप व धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. महादेव सुभाष साठे (वय 21), सोमनाथ संजय कांबळे (वय 19), अनुराग भुजंग ससाणे (वय 19, तिघेही रा. यमुनानगर, विमाननगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धांत चंपालाल चोरडीया (वय 30, रा.आळंदी रस्ता) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरडीया हे व्यावसायिक आहेत. ते 3 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील मंत्री आयटी पार्कजवळच्या दुकानासमोर सरबत घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्याकडील लॅपटॉप जबरदस्तीने हिसकावून घेतला. लॅपटॉप परत करण्यासाठी फिर्यादीकडे अडीच हजार रुपयांची मागणी केल्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या खिशातील अडीच हजार रुपये, लॅपटॉपजबरदस्तीने काढून घेतला. तसेच फियार्दीवर कोयता, लोखंडी सळई व अन्य धारदार शस्त्रांनी वार करुन आरोपी तेथून पळून गेले. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी हे फोर पॉईंट हॉटेलजवळच्या मोकळ्या जागेत बसल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे उमेश धेंडे, रमेश लोहकरे, सचिन जाधव यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप व धारदार शस्त्र जप्त केले.