बारामती : राज्यभरातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू असून अशैक्षणिक ऑनलाईन कामामुळे शिक्षक वैतागले आहेत. ‘आम्हाला शिकवू द्या’ या मागणीसाठी शिक्षक संघाने ५ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची हाक दिली असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
राज्यभरातील प्राथमिक शाळांमधील ६ ते १४ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण हक्क अधिनियमानुसार शासनाने घेतलेली आहे. मात्र सध्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. गोरगरीब कुटुंबातील शिक्षणाची व्यवस्था असलेल्या सरकारी शाळा धोक्यात आली असल्याचे चित्र आहे. शाळा सुरू झाल्यापासून शंभर प्रकारची माहिती मागवली गेली आहे. राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, डाएट, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या स्तरावरून शिक्षकांना कागदी घोडे नाचवण्यासाठी सांगितले जात असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी सांगितले.
‘डाएट’ विषयी संताप...
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मोठया प्रमाणात हस्तक्षेप सुरू असून प्रशिक्षण व ऑनलाईन माहितीस शिक्षकांचा विरोध आहे.
...जिल्हा परिषदांमधील दप्तर दिरंगाई
वर्षानुवर्षे रखडलेल्या मुख्यध्यापक पदोन्नती, महानगरपालिका हद्दवाढ गावातील शिक्षक, विज्ञान, समाजशास्त्र पदवीधर तसेच अवघड क्षेत्रात बदली झालेले सेवाजेष्ठ शिक्षक यांच्यासाठी जिल्हापरिषदेच्या असंवेदनशील धोरणामुळे उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.
...ऑनलाईन माहितीचा अतिरेक
शालार्थ, स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, यु-डायस पोर्टल, बदली पोर्टल, दिक्षा ॲप, एमडीएम ॲप, विनोबा ॲप, प्रशिक्षणे लिंक यांसारखी दररोज वेगवेगळी ऑनलाईन माहिती मागवली जाते त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
...शिक्षण विभागात संवादाचा अभाव
शिक्षण विभागामध्ये शिक्षक प्रतिनिधींची भूमिका ऐकून घेण्यासाठी कोणीही तयार नाही, संवादाचा अभाव असल्याने ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी शिक्षकांना काळ्या फिती लावून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.- बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ, पुणे