राजू इनामदार
पुणे : लोकसभेच्या पुणे शहर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात विचार सुरू आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने आता पुन्हा धोका नको, यातून हा पर्याय अवलंबण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बापट कुटुंबीयांनी बापट गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बापट यांचे कसब्यातील संपर्क कार्यालय सुरू केल्याने याला पुष्टी मिळत आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ज्या घाईने त्यांच्यासंबधीतील सर्व निर्णय झाले, त्यावरून वायनाडमध्ये पोटनिवडणूक व्हावी, असाच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा कल आहे. त्याबरोबरच निवडणूक आयोग पुणे लोकसभेच्या रिक्त जागेवर निवडणूक जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच या रिक्त जागेचा भाजपत राज्यस्तरावर तातडीने विचार करण्यात येत आहे. पुण्यातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्यापुढे उमेदवारीसाठी हा पर्याय ठेवला असल्याचे समजते.
पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, लोकसभेच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपण्यात अवघे सव्वा वर्ष बाकी आहे. तेवढ्या कालावधीसाठी दुसरा उमेदवार देऊन धोका पत्करण्याची पक्षाची तयारी नाही. त्यामुळे बापट कुटुंबात उमेदवारी दिली तर विरोधकांना निवडणूक बिनविरोध होऊ द्या, असे आवाहन करता येईल. बापट यांचे पुण्यातील सर्वपक्षीय संबंध पाहता याला फारसा विरोध होणार नाही व जागा कायम राहील, असा युक्तिवाद करण्यात येत आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात पक्षाने उमेदवारी नाकारली. त्याचा फटका पक्षाला बसला. सलग २८ वर्षे ताब्यात असलेला मतदारसंघ सोडावा लागला. पुणे शहर लोकसभा मतदारसंघावर आता भाजपचे चांगले वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ताब्यातून घालवणे भाजपला परवडणारे नाही. त्यातूनच पक्षातील काही ज्येष्ठांनी उमेदवारी बापट यांच्या कुटुंबातच देण्याचा उपाय पुढे केला आहे.
उमेदवारी पत्नी किंवा सुनेला?
बापट कुटुंबात उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर दिवंगत खासदार बापट यांच्या पत्नी गिरिजा किंवा स्नुषा स्वरदा असे दोन पर्याय आहेत. त्यांचा मुलगा गौरव यांना राजकारणात फारसा रस नाही. स्वरदा या मात्र लग्नाआधी सांगली महापालिकेच्या नगरसेविका होत्या. त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम करत होत्या, असे सांगण्यात येते. बापट यांच्या खासदारकीच्या निवडणुकीपासून त्या पुण्यामध्ये भाजपत सक्रिय आहेत.
समर्थकांचाही पाठिंबा
बापट यांचे कसबा पेठेतील जनसंपर्क कार्यालय भाजप वर्तुळात प्रसिद्ध आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे कार्यालय बापट कुटुंबीयांनी सुरू केले. त्यामुळे बापट समर्थकही या उमेदवारीला तयार असल्याचे दिसते आहे.