निलेश राऊतपुणे : पुणे लोकसभा मतदार संघामध्ये मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यात येणार असून, सर्व मराठा समाजाने संबंधित उमेदवाराच्या पाठिशी पुर्णपणे उभे राहावे. असा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीमध्ये मनोग जरांगे यांनी केलेल्या सुचनेनुसार इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 30 मार्चपर्यंत पुण्यातील इच्छुकांचे अर्ज भरुन घेऊन ते सर्व अर्ज मनोज जरांगे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. मनोज जरांगे हे पुण्यातील उमेदवार जाहिर करणार आहेत. दरम्यानच्या काळात प्रत्येक प्रभागामध्ये छोट्या छोट्या बैठका घेऊन मराठा समाजाच्या मतांचा विचार ही केला जाणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीन खंडोजी बाबा मंदिरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्वती, वारजे, शिवाजीनगर, वडगावशेरी, धनकवडी, कोथरुड, कर्वेनगर, स्वारगेट, कात्रज, बाणेर, पाषाण आदी भागातील मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून, ज्या मागण्या आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केल्या त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून जे मागितले नाही. व नको ते दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची बोळवण केली आहे. त्यामुळे सरकारला मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार देण्याबाबत यावेळी चर्चा झाली.