Pune Accident: पुण्यातील एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा अपघात मुंबई-पुणे महामार्गावर घडला आहे. एका भरधाव कारने समोरच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील तरुण दूर जाऊन पडले. पाठीमागे कोणतेही मोठे वाहन नसल्याने दोघांचेही जीव थोडक्यात वाचले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यातील वाकड परिसरातील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ हा अपघात घडला आहे. एका सेडान कारने दुचाकीला धडक दिली.
समोर चाललेल्या दुचाकीला उडवले
बाजूने चाललेल्या एका कारच्या डॅशकॅममध्ये हा अपघात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन्ही तरुण दुचाकीवरून चालले आहेत. त्याचवेळी अचानक वेगाने सेडान कार येते. दुचाकीला कट मारून पुढे जाण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले.
गाडी वेगाने फिरली आणि कारचा पाठीमागचा भाग दुचाकीला जाऊन धडकला. त्यानंतर दुचाकीवरून दोन्ही तरुण लांब जाऊन पडले. एक तरुण दुसऱ्या गाडीच्या चाकाखाली जाताना थोडक्यात बचावला. दुसरा तरुण रस्त्याच्या मधोमध्य पडला.
दोन्ही तरुण जखमी, दुचाकीचेही नुकसान
पाठीमागून येणारे वाहन अंगावरून जाण्याच्या भीतीने दोन्ही तरुण लगेच उठले आणि दुभाजकाच्या ठिकाणी गेले. यातील दोन्ही तरुण अपघातात जखमी झाले असून, दुचाकीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर काही लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले.
सेडानने दुचाकीला धडक देतानाच व्हिडीओ बाजूने जात असलेल्या कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाला. दुचाकीला कट मारून पुढे जात असताना कार चालकाचे नियंत्रण वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे. या प्रकरणाचा आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.