किरण शिंदे, पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेत नमाज पठण केल्याप्रकरणी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ५ मे २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप गोडसे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार आता अज्ञात मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी २९५ (अ), १८८, १४३, मपोअधी ३७(१) (ई) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सारसबाग हे पुण्यातील प्रसिद्ध उद्यान आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या या उद्यानात ५ मे रोजी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींनी प्रवेश केला. त्यानंतर सारस बागेतील गणपती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेड जवळील लॉन्सवर एकत्र येऊन नमाज पठण केले. त्यामुळे पालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करून गैर कायदेशीर मंडळी जमवून गैर कृत्य केले.
इतर समाजाच्या भावना दुखून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नमाज पठण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.