पुणे : एका गुन्हयात दोषारोपत्रामध्ये मदत करण्यासाठी आणि गुन्हयातील आरोपींना अटक न करण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशनच्या सहायक महिला पोलीस निरीक्षकासह शिपायावर 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सहायक महिला पोलीस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे आणि पोलीस शिपाई अभिजित विठठल पालके अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका 27 वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल असलेल्या गुन्हयाच्या दोषारोपोत्रात मदत करण्यासाठी आणि फिर्यादी यांचे आई वडील व बहिणीला अटक न करण्यासाठी दोघांनी लाचेची मागणी केली. तडजोडी अंती अभिजित पालके याने 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्याला हर्षदा दगडे यांनी सहाय्य केले म्हणून दोघांवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.