बारामती (पुणे) : शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठीचा प्रस्ताव बारामती प्रांत कार्यालयात पाठविण्यासाठी मोबदला म्हणून मागितलेल्या लाचप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जळोची परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून गुरुवारी(दि. ९) रात्री ही कारवाई करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संदीप गोंजारी (लघु पाटबंधारे विभाग, बारामती) व रणजित प्रकाशराव सूर्यवंशी (रा. इंदापूर) अशी लाच प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दोघा जणांची नावे आहेत. सूर्यवंशी हे शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
वडापुरी येथील एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. गोंजारी यांनी तडजोडीअंती अडीच लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यांच्या वतीने सूर्यवंशी यांनी ही रक्कम स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
गोंजारी व सूर्यवंशी यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, वीरनाथ माने, पोलिस अंमलदार सौरभ महाशब्दे, अभिजित राऊत, प्रवीण तावरे यांनी सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे अधिक तपास करीत आहेत.