किरण शिंदे
पुणे : पनवेल येथील एका ऑर्केस्ट्रा मध्ये नाचताना वाद झाल्यानंतर भाजप पदाधिकारी यांनी २ जणांना धक्का मारून खाली पाडले आणि मारहाण केली होती. तसेच ज्या तरुणांना मारहाण केली त्यांच्या अंगावर असलेले सोने देखील लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात गणेश गीते यांनी या फिर्याद दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे दोघे ही एमकांच्या ओळखीचे आहेत. २० जुलै रोजी फिर्यादी आणि त्यांचा मित्र पनवेल मधील एका ऑर्केस्ट्रा मध्ये गेले होते. त्या ठिकाणी आरोपी आणि त्यांचे मित्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थितीत होते. दरम्यान, मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास नाचत असताना आरोपी यांनी फिर्यादी यांना मुद्दाम धक्का दिला. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपी ने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसेच यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिस्कवली असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळवण्याच्या वादातून शहरातील खडक पोलिस ठाण्यात ठेकेदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. तर मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्याने भाजप पदाधिकाऱ्याविरोधात त्याची दीड तोळ्याची सोन्याची चैन मागण्यासाठी गेलो असता गळा पकडून शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद दिली होती. याप्रकरणात नवीन पनवेल पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यावरून गंज पेठेतील वादाचे मूळ हे पनवेलच्या डान्स बारमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. निर्मल हरीहर (रा. २३१, गंजपेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी पुणे महापालिकेचे अभियंता गणेश राजेंद्र गिते (३७, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
गिते यांनी दिलेल्या फिर्यादीत ते त्यांचा मित्र कमलेश क्षीरसागर याच्यासोबत पनवेल येथील बिंदास ऑर्केस्ट्रा बारमध्ये २० जुलै रोजी गेले होते. त्यावेळी गिते यांच्या ओळखीचे निर्मल हरीहर हे त्यांच्या चार मित्रांसोबत तेथे आले होते. मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास सगळे जण नाचत असताना, निर्मल हरीहर याने गिते यांना मुद्दाम दोन ते तीन वेळा धक्का दिला. यानंतर गिते यांनी मला धक्का का देतो? असे निर्मल याला विचारले असता त्याने जोरात धक्का देऊन गिते यांना खाली खुर्चीवर पाडले, तसेच त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतल्याचे गिते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर गिते तेथून निघून पुण्यातील त्याच्या घरी आले. व पनवेल तालुका पोलिस ठाण्यात ई मेलद्वारे गळ्यातील ९० हजार रुपयाची सोन्याची चैन हिसकावल्याची तक्रार त्यांनी केली होती. या प्रकारानंतर पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात दोघांकडून वेगवेगळ्या कारणांनी परस्पर फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र, या प्रकरणात अद्यापही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली नसून, यातील एका पदाधिकाऱ्याची आई शहरातील माजी नगरसेविका असल्याने पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गिते यांनी केला आहे.