पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गाह परिसरात असलेल्या मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत मनपाच्या कारवाईबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने अफवा पसरवून गैरकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी शेख सल्ला दर्गाह ट्रस्टच्या काही जणांसह अन्य १३ जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ०९) गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार समीर शेख, किरण शेख, साद खान, बाबा भाई शेख, अख्तर शब्बीर पिरजादे, अहमद खान, रमजान गुलाब शेख, अर्शद इनामदार, खलील लतीफ सय्यद, अकबर सय्यद यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस हवालदार प्रमोद लालासाहेब जगताप (वय-४४) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरातील मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे मनपा कारवाई करणार आहे. या कारवाईबाबत चुकीची अफवा शुक्रवारी (दि.८) रात्री पसरवण्यात आली होती. यानंतर चार ते पाच हजार मुस्लिम बांधव या परिसरात जमले होते. सोशल मीडियावर ही अफवा व्हायरल झाल्यावर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. समाजमाध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस करत आहेत.