पुणे: जिच्या मदतीने अनेक व्यावसायिकांना बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन लुबाडले त्या वकिलावरच आता त्याच तरुणीने बलात्काराची फिर्याद दिली आहे. दुसऱ्यांबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. विक्रम भाटे (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय ३४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना अडकवून त्यांच्यावर बलात्कारची केस करण्याची धमकी देऊन अॅड. विक्रम भाटे याने १७ लाखांना लुबाडले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या व्यावसायिकाच्या मैत्रिणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाघोलीत जून २०२१ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हिची वैभव शिंदे, अॅड. विक्रम भाटे हे ओळखीचे आहेत. ते फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी कोल्ड्रींकमध्ये काही तरी मिसळून तिला आग्रह करुन पिण्यास दिले. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने तिच्याशी शारीरीक संबंध केला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे नकळत व्हिडिओ चित्रण केले. ते फिर्यादीला दाखवून तिला दुसर्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे चित्रण करुन त्या व्यावसायिकांना लुबाडले. हडपसरमधील व्यावसायिकालाही असेच हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास फिर्यादीला सांगितले होते. परंतु, तिने तो आपला मित्र असल्याने नकार दिला. तेव्हा फिर्यादीच्या सहाय्याने दुसऱ्या तरुणीच्या मदतीने भाटे याने या व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून १७ लाख रुपये उकळले. शेवटी हा व्यावसायिक तिचा मित्र असल्याने फिर्यादीने ॲड. भाटे व आम्ही सर्व जण अशा प्रकारे लुबाडणूक करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भाटे याला अटक केली. त्यानंतर आता या तरुणीनेही आपल्यावर बलात्कार केल्याची फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.