पुणे : सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक पद असून या पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक आगळीक केल्याने याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंगटे हे गुडलक हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी बसले होते. यावेळी ते त्यांचे फेसबुक अकाऊंट पहात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. या चौकशीचा निषेध करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी भाषण केले. त्यात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने अर्वाच्च भोषत वक्तव्य केले. त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या असून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक, भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्यास चिथावणी दिली. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.