पुणे : शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ४५ जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शैलेजा दराडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात तब्बल साडेचार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शैलेजा दराडे या परीक्षा परिषदेच्या आयुक्त आहेत.
याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका ५० वर्षाच्या शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) आणि शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा उत्तम खाडे (पूर्वाश्रमीच्या शैलजा रामचंद्र दराडे) आणि दादासाहेब दराडे हे भाऊ बहीण आहेत. दादासाहेब दराडे याने शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या २ वहिनींना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी १२ लाख व १५ लाख रुपये असे २७ लाख रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे इतर ४४ जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
याबाबत शैलजा दराडे यांना आपल्या भावाचा हा उद्योग समजल्यावर त्यांनी वर्षभराने आपला भावाशी काहीही संबंध नाही. दादासाहेब दराडे हा सखा भाऊ असल्याचा गैरफायदा घेऊन लोकांना कामे करुन देण्याबाबत सांगत आहेत. शैलजा खाडे यांनी त्याच्याशी संबंध तोडलले आहे. त्यामुळे दादासाहेब दराडे भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करु नये, अशी जाहीर नोटीस ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले अधिक तपास करीत आहेत.