पुणे : अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याची घटना विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. २३) रात्री अकराच्या सुमारास खांदवेनगर येथील एका सोसायटीच्या बाल्कनीत घडला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खराडी येथे राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेने रविवारी (दि. २४) विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून श्रीधर गणपत उकीर्डे (२५, रा. मु. पो. कान्हुर मेसाई, उकीर्डे वस्ती, ता. शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरातील खांदवेनगर येथे पीडित फिर्यादी महिलेच्या घराचे बांधकाम सुरु आहे. महिला घराच्या बांधकामास पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांच्या घरासमोर राहणारा श्रीधर हा त्याच्या घराच्या बाल्कनीत आला. त्याने अंगावरील सर्व कपडे काढून फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सीआरपीसी नुसार नोटीस बजावली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार भोसले करत आहेत.