पुणे: पैशांसाठी ठरलेले लग्न मोडले. त्यानंततर मुलीच्या कुटंबियांची बदनामी केली. याप्रकरणी पुणेपोलिस दलाच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या भाऊ-बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ या कालावधीत घडल्याने तक्रारीत म्हटले आहे. आसीफ फक्रुद्दीन पठाण (२७, रा. विश्रांतवाडी पोलिस लाईन) आणि त्याची बहिण रुकय्या फक्रुद्दीन पठाण (३१, रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्या भाऊ-बहिणीची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये फिर्यादी यांना आसिफ याच्या लग्नासाठी स्थळ आले होते. एकमेकांची पसंती आल्यावर २३ ऑक्टोबर रोजी कोंढवा येथे साखरपुडा झाला. त्यानंतर फिर्यादी आणि आसिफचे फोनवर संभाषण सुरू झाले. या दरम्यान २४ वर्षीय फिर्यादीच्या घरच्यांनी घरगुती वारण्यासाठीचे काही साहित्य आसीफला दिले. यानंतर आसीफने मी १५ लाखांची सोसायटी काढली असून, त्या कर्जाची परफेड करण्यासाठी घरच्यांकडून १० लाख मला दे असे होणाऱ्या पत्नीला सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी लग्न झाल्यावर पैसे देऊ असे सांगितले असता, या कारणावरून दोघांमध्ये मतभेद झाले.
२१ मे रोजी लग्नाची तारीख ठरलेली असताना, त्याच्या काही दिवस आधी आसीफची बहीण रुकय्या ही फिर्यादी यांच्या घरी गेली. यावेळी रुकय्याने फिर्यादीच्या घरच्यांनी पाठवलेले सामान सोबत आणत, त्याची तोडफोड केली. तसेच, भावाला १० लाख दिले नाही म्हणत शिवीगाळ करत तुझे लग्न कसे होते त बघून घेतो अशी धमकी देखील दिली. यानंतर आरोपींनी लग्नासाठी खर्च करण्यास फिर्यादी आणि तीच्या घरच्यांना भाग पाडून समाजात बदनामी देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक थोरवे करत आहेत.