कात्रज : नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदीर परिसरात पडक्या उंच इमारतीवरुन एक तरुणी व एक तरुण यांचा जीव धोक्यात टाकून केलेला धोकादायक स्टंटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ शहरात सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशा धोकादायक पद्धतीने रिल्स बनवल्यामुळे अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी व्हिडीओची खात्री करुन तरुण व तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
स्वतःचा व इतरांचा जीव व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केल्याबद्दल भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर भादंवि कलम ३३६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या रिल्समधील तरुण व तरुणीचा शोध सुरु आहे. त्यांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी, भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, व पथकाने केली. तसेच अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे धोकादायक कृत्य करू नये असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे.